Friday, December 25, 2015

शंकरपाळी - खारी ( Shankarpali - Khari )

साहित्य :
            १ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा, २ चमचे ओवा, मीठ, तेलाचे मोहन पाव वाटी, तळण्यासाठी तेल.

कृती :
         ओवा मिक्सरवर जाडसर करून घ्यावा. रवा,मैदा, मीठ व ओवा एकत्र करून तेलाचे कडकडीत मोहन घालून सर्व नीट मिसळून घ्यावे व पाण्याने घट्ट भिजवून घ्यावे. १/२ तासाने पीठाचे मोठे गोळे करून घ्यावेत. मग पोळपाटावर मोठी पोळी लाटून कातण्याने अथवा सुरीने चौकट आकाराचे बारीक तुकडे करून ते कढईत तेल गरम करून घेऊन मंद आंचेवर तांबूस रंगावर तळावेत.  खुसखुशीत होतात.


आलू पालक ( Aloo Palak )

साहित्य :
             पालकची मोठी जुडी, ३-४ मध्यम आकाराचे बटाटे, ८-१० लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमाणे, १ लिंबाचा रस, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, चवीपुरती साखर.

कृती :
           पालक निवडून, धुवून बारीक चिरून घ्यावा. कुकरमध्ये एका भांड्यात बटाटे व दुसर्या भांड्यात चिरलेला पालक, त्यातच हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावा. गार झाल्यावर त्यातील पाणी निथळून एका भांड्यात काढून बाजूला ठेवावे. मिक्सरमध्ये प्रथम लसूण घालून बारीक करून, त्यातच शिजलेला पालक घालून बारीक पेस्ट करावी. मग त्यात बाजूला काढून ठेवलेले पालकाचे पाणी घालून मिसळून घ्यावे. कढईत तेल व मोहरी, हिंग घालून फोडणी झाल्यावर त्यात बारीक केलेले पालकाचे मिश्रण घालावे, मीठ व चवीपुरती साखर घालून हलवावे. गरज वाटल्यास पाणी घालावे, पण फार पातळ करू नये. थोडावेळ शिजल्यावर खाली उतरवून त्यात लिंबू पिळावे. गार झाल्यावर या भाजीला दाटपणा येईल. भातावर अथवा पोळी, पुरीबरोबर सुद्धा ही भाजी चांगली लागते.



Monday, December 21, 2015

शंकरपाळी - गोड ( shankarpali - goad )

साहित्य :
            मैदा, १ वाटी पातळ केलेले तूप, १ वाटी साखर, १ वाटी पाणी, तळण्यासाठी तेल. 

कृती :
             तूप, पाणी, साखर हे तिन्ही एकत्र करून गॅसवर उकळत ठेवावे. साखर विरघळवून पाणी उकळल्यावर खाली उतरवावे व गरम असतानाच त्यात बसेल एवढा मैदा घालून घट्ट मळून घ्यावे. नंतर १/२ तासाने त्याचे गोळे करून पोळपाटावर  मोठी पोळी लाटून कातण्याने चौकट आकाराचे लहान - लहान तुकडे करून, तळावेत. 
          



Sunday, December 20, 2015

चकली - भाजणीची ( Chakli - Bhajanichi )

साहित्य : 
           ६ वाट्या तांदूळ, ३ वाट्या हरबरा डाळ, दीड वाटी उडीद डाळ, पाऊण वाटी मूग डाळ, पाव वाटी जिरे, पाव वाटी धणे, १ वाटी पातळ पोहे, ओवा ३ चमचे, पांढरे तीळ ३ चमचे, मीठ, तिखट, हळद, हिंग, तेलाचे पाव वाटी मोहन, गरम पाणी, तळण्यासाठी  तेल.

कृती :
          प्रथम भाजणी करण्यासाठी ...... तांदूळ, हरबरा डाळ, उडीद डाळ व मूग डाळ धुवून घेऊन, उपसून, वेगवेगळे स्वच्छ फडक्यावर पसरून ठेवावे. साधारण ४ - ५ तासांनंतर ते वाळल्यावर, पण जरासे ओलसर असतांना कढईत एकानंतर एक असे भाजावे. पण फक्त ओलसरपणा जाऊन कोरडे होईपर्यंत थोडेसेच भाजावे. जास्त भाजू नये. तसेच पोहे, जिरे, धणे पण भाजून घ्यावे. हे सर्व एकत्र करून गिरणीतून दळून आणावे. साधारणपणे याची २ किलो भाजणी तयार होईल.
         चकल्या करताना ...... ४ वाट्या भाजणी घेतल्यास तेवढेच पाणी गरम करून घ्यावे. पीठामध्ये ओवा, तीळ, मीठ, तिखट, हळद, हिंग घालून सर्व एकत्र नीट मिसळून घ्यावे. मग त्यात पाव वाटी तेलाचे कडकडीत मोहन घालावे, पुन्हा नीट मिसळून घ्यावे.  गरम केलेले पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्यावे. कढईत तळण्यासाठी  तेल गरम करत ठेवावे. चकलीपात्रात पीठ घालून कागदावर चकल्या नीट गोल पाडून घ्याव्यात. तेल तापल्यावर कागदावरील चकल्या अलगद उचलून तेलात सोडाव्यात व मंद आँचेवर तळाव्यात. 
          (  चकल्या कढईतून काढल्यावर एका लहान ताटात ठेवताना आवाज आला पाहीजे म्हणजे ती नीट तळली असे समजावे. पण ताटात काढताना जर बद्द आवाज आला तर ती अजून व्हायची आहे असे समजावे. ) 



गाजर पराठे ( Gajar Parathe )

साहित्य :
           १/२ किलो गाजर, २ चमचे ओवा, २ चमचे पांढरे तीळ, पाव चमचा हळद, ३ चमचे लाल तिखट, २ चमचे मीठ, कणिक, २ चमचे तांदळाचे पीठ, चमचाभर तेल. 

कृती :
          गाजराची साल काढून ती किसून घ्यावीत. त्यातच ओवा, तीळ, हळद, तिखट, मीठ घलून कालवावे. या मिश्रणाला पाणी सुटेल. मग त्यात मावेल एवढी कणिक व तांदळाचे पीठ घालून तेल घालावे. कणिक तेलाच्या हाताने घट्ट मळून घ्यावी. ( पाणी घालायची गरज भासत नाही. गाजराच्या किसात तिखट- मीठ जरा जास्तच घालावे, म्हणजे पीठ घातल्यावर ते अळणी होणार नाही ) नेहमीप्रमाणे लाटून तव्यावर नीट तेल लावून भाजून घ्यावेत. 
           या पराठ्याबरोबर तोंडी लावायला कोणतीही चटणी अथवा लोणचे व टोमेटो , कांदा, काकडी त्याचप्रमाणे लोणी, दही वगैरे छानच लागते.



Friday, December 18, 2015

गाजर हलवा ( Gajar Halwa )

साहित्य : 
           १/२ किलो लाल गाजर, २ वाट्या साखर, पाव वाटी साजुक तूप, १/२ कप दुधावरची साय किंवा २०० ग्राम खवा, बदामाचे उभे काप, काजूचे तुकडे, बेदाणे, वेलदोडयाची पूड.

कृती : 
          गाजराची साल काढून किसणीने गाजर खिसून घ्यावीत. कढईत तूप घालून त्यात किस घालून चांगला शिजेपर्यंत झाकण ठेवून वाफवून घ्यावा. मग त्यात साय किंवा आधीच भाजून घेतलेला खवा घालून पुन्हा परतावे. ( ४ - ५ पेढे कुस्करून घातले तरी चालतील ). किस जरा कोरडा झाल्यावर साखर घालून पुन्हा कोरडा होईपर्यंत मंद आंचेवर परतावा. मग खाली उतरवून वेलदोडयाची पूड व ड्रायफ्रूटस् घालून त्यानेच सजवून गाजर हलवा पेश करावा.

Wednesday, October 28, 2015

रताळ्याचा कीस ( Grated Sweet Potato )

साहित्य :
            अर्धा किलो रताळी, १/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, ४-५  हिरव्या मिरच्याचे तुकडे, मीठ, साखर, फोडणीसाठी तूप, जिरे, कोथिंबीर , नारळाचा चव.

कृती :
         रताळी स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. त्याची सालं काढून किसून घ्यावीत. कढईत तूप जिर्याची फोडणी करावी, त्यात हिरव्या मिरच्या घालून किसलेला रताळ्याचा  किस घालून तो मंद आचेवर, झाकण ठेवून वाफवावा. त्याचा रंग बदलतो. किस पूर्ण शिजल्यावर त्यात दाण्याचा कूट, मीठ व चवीपुरती साखर घालून हलवावे. 
           वरून कोथिंबीर व नारळाचा चव पसरून गरम - गरम खायला छान लागतो. 

मुखशुद्धी ( mukhashuddhi )

साहित्य :
             चांगली कोवळी व ताजी ३० विड्याची ( खाऊची ) पाने, पाव वाटी मसाला सुपारी ( बिनसुपारीची ), २ चमचे गुलकंद,  ४ चमचे सुके खोबरे, पाव टीस्पून काथपूड, अर्धा चमचा वेलचीपूड, लवंगा ४-५, पाव वाटी बडीशोप, गुंजेचा पाला ( आवडत असल्यास ), २ चमचे साखर. 

कृती :   
           सर्व साहित्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी - जास्त करता येते. विड्याची पाने स्वच्छ पुसून बारीक चिरून घ्यावीत. मग मिक्सरमध्ये प्रथम लवंगा, साखर, बडीशोप, सुके खोबरे घालून बारीक करून, त्यात इतर साहित्य व चिरलेली पाने घालून बारीक करावे. विड्याच्या पानात घालण्यासारखे इतरही काही जिन्नस यात घालू शकता.
          हे तयार तांबूल जेवणानंतर खावयास दिल्यास विडा खालल्याचा आनंद घेता येतो व सणावारी इतर धावपळीमुळे विडे तयार करण्याचा वेळही वाचतो. 
            


कडाकण्या ( Kadaknya )

साहित्य :
               बारीक रवा, बेसन, १/२ वाटी गूळ, १ ग्लास पाणी, तळण्यासाठी  तेल. 

कृती : 
           गूळामध्ये पाणी घलावे. गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यावा. मग त्या गुळाच्या पाण्यात बसेल एवढे बेसन व रवा ( रव्याचे प्रमाण कमी, बेसनाच्या १/४ ) घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. अर्धा तासानंतर त्याच्या जरा मोठ्या पातळ पुर्या लाटून कढईत मंद आचेवर तळून घ्याव्यात . या पुर्या कडक होतात. पण खुसखुशीत छान लागतात. 
           बहुतेक घरांमध्ये देवीच्या नवरात्रात अष्टमीदिवशी या कडाकण्यांचा नैवेद्य असतो. 

Thursday, October 8, 2015

बाजरीची ऊसळ ( Bajarichi Usal )

साहित्य :
           दोन वाट्या मोड आलेली बाजरी, एक मोठा कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, किसलेले सुके खोबरे, तिखट, मीठ, गरम मसाला, फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, गूळ. 

कृती : 
         सकाळी बाजरी पाण्यात भिजवून ठेवावी. रात्री त्यातील पाणी काढून फडक्यात घट्ट बांधून ठेवावी किंवा स्प्राऊट मेकरमध्ये ठेवावी. दूसरे दिवशी छान मोड आलेले दिसतील. बाजरी कुकरमध्ये शिजवून घ्यावी. कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कढीपत्ता, कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, घालून शिजवलेली बाजरी घालावी. मग तिखट, मीठ, गरम मसाला, खोबरे घालून हलवावे. चवीपुरता गूळ घालावा. वरून कोथिंबीर घालावी. आवडत असल्यास बाजरी शिजवतानाच त्यात थोडे शेंगदाणे घालावेत. उकडलेले शेंगदाणे चवीला छान लागतात. कांद्याबरोबर एखादा टोमेटो पण चांगला लागतो. 

Tuesday, October 6, 2015

कवठाची चटणी ( Kawathachi Chutney )

साहित्य : 
            २ पिकलेली कवठं, तिखट, मीठ, जिरेपूड, गूळ. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.

कृती : 
          कवठं फोडून त्यातील गर काढून घ्यावा. त्यातील शीरा काढून टाकाव्यात. त्यात तिखट, मीठ, जिरेपूड व गराच्या निम्मा गूळ घालून ( कवठं आंबट असल्यास जास्त गूळ घालावा ) चांगले कालवावे. मग मिक्सरवर जरा जाडसरच करावे. वरून तेलाची, हिंग व मोहरी घालून फोडणी द्यावी.

Friday, October 2, 2015

रव्याचा केक - अंड्याशिवाय व ओव्हनशिवाय ( Rawa Cake - Eggless & without Oven )

साहित्य :
             दीड वाटी बारीक रवा, १/३ वाटी तूप, १/२ वाटी दही, ३/४ वाटी दूध, १ वाटी पिठीसाखर, १/२ टीस्पून बेकींग पावडर, १/३  टीस्पून सोडा, १/३ टीस्पून वेलची पूड, २ चिमुटभर मीठ, १/३ वाटी ड्रायफ्रूटस्, टूटी फ़्रूटी.

कृती : 
           रवा जाड असल्यास मिक्सरवर बारीक करून घ्यावा. मग रवा, मीठ, वेलची पूड, साखर, तूप हे एकत्र करून त्यात दही व घेतलेल्या दूधातील अर्धे दूध घालून हलवावे. गुठळ्या राहू नयेत. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे. कुकरची शिट्टी काढून आतील स्टँड बुडेल इतपत पाणी घालून झाकण ठेवून उकळत ठेवावे. तोपर्यंत मिश्रण थोडे घट्ट झालेले असेल. त्या मिश्रणामध्ये उरलेले दूध घलावे व थोडे ड्रायफ्रूटस्, टूटीफ्रूटी, बेकींग पावडर, सोडा घालून चांगले फेसावे. एखद्या पसरट aluminium भांड्यात किंवा कुकरच्याच भांड्याला सगळीकडून तूप लावून तळाला उरलेले ड्रायफ्रूटस् , टूटी फ़्रूटी घालून त्यावर मिश्रण घालावे. कुकरमधील पाणी उकळल्यावर झाकण काढून त्याची रींग काढून आतील स्टँडवर भांडे ठेवावे. कुकरचे झाकण आतून नीट पुसून घ्यावे. ( बाष्प तयार झालेले असेल, ते मिश्रणावर पडू नये ) परत झाकण घालून मंद आचेवर २० मिनिटे ठेवावे व नंतर मध्यम फ्लेमवर ५ मिनिटे ठेवावे. नंतर झाकण काढून टूथपिक घालून झाले की नाही ते बघावे व परत कुकरचे झाकण न घालता १ मिनिट ठेवावे. मग गॅस  बंद करावा. थोड्या वेळाने गार झाल्यावर भांडे बाहेर काढावे. भांड्यावर एक ताटली ठेऊन ते उलटे करावे व भांडे अलगद काढून घ्यावे. 
          ह्या केकवर आइसिंग पण करू शकता, किंवा बदामाचे काप व बेदाणे वगैरे लावून सजवू शकता.

Saturday, September 26, 2015

पेरूचे पंचामृत ( Peruche Panchamrut )

साहित्य :
          पिकलेले किंवा अर्धवट पिकलेले पेरू, चिंचेचा कोळ, गूळ, सुके खोबरे ( किसलेले अथवा पातळ छोटे काप केलेले ), भाजून सोललेले शेंगदाणे, फोडणीसाठी तेल, मोहरी, मेथ्या, हिंग, हळद, भाजलेल्या दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मीठ.

कृती : 
         पेरू धुवून पुसून त्याच्या फोडी कराव्यात. बिया जास्त असल्यास बियांचा भाग काढून टाकावा. पातेल्यात तेल घालून मोहरी, हिंग, मेथ्या व हळद घालून फोडणी तयार करावी. त्यात प्रथम भाजलेले शेंगदाणे, सुके खोबरे व नंतर हिरव्या मिरच्या घालून परतावे. मग त्यात पेरूच्या फोडी घालून त्या बुडतील इतपतच पाणी घालावे. फोडी शिजत आल्या की चिंचेचा कोळ घालावा. मीठ घालून हलवावे. दाण्याचा कूट घालून गूळ घालावा. गूळ विरघळल्यावर पुन्हा थोडा वेळ शिजवावे. थोडे सरबरीतच ठेवावे, घट्ट करू नये. हे आंबट - गोड पंचामृत फारच चविष्ट लागते. 

Monday, September 7, 2015

गोपाळकाला ( दहीकाला ) Gopalkala ( Dahikala )

साहित्य :
           १ वाटी ज्वारीच्या लाह्या, २ वाट्या जाड पोहे, एक बारीक चिरलेला मोठा कांदा, कैरी / लिंबू / मिरचीचे तयार लोणचे २ चमचे ( यापैकी कोणतेही एक अथवा मिक्स लोणचे ), दही अर्धी वाटी, ताक एक वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, साखर एक चमचा, फोडणीसाठी तेल, मोहरी, उडीद डाळ, हिंग, कढीपत्ता, शेंगदाणे २ चमचे. 

कृती :
          जाड पोहे चाळणीवर धुऊन निथळून ठेवावे. एका तसराळ्यात लाह्या, भिजवलेले पोहे एकत्र करून त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर , लोणचे, मीठ ( लोणच्यात मीठ असल्याने त्या अंदाजाने घालावे ), साखर घालून हलवावे. मग दही, ताक घालून हलवावे. फोडणी तयार करावी, त्यात मोहरी, उडीद डाळ तडतडल्यावर हिंग घालून शेंगदाणे तळून घेऊन कढीपत्ता घालावा व मिश्रणावर फोडणी ओतावी. हलवल्यावर काला जर घट्ट वाटला तर वरून थोडे ताक घलावे. पण डावाने फार हलवू नये किंवा पोहेसुद्धा फार पाणी घालून भिजवू नयेत कारण ताकामुळे ते परत भिजतातच. नाहीतर काला गिचका होतो. 
          हा गोकुळाष्टमीचा खास आवडता पदार्थ आहे.

Friday, September 4, 2015

केशर रव्याचा उपमा ( Keshar Ravyacha Upama )

साहित्य :
             २ वाट्या केशर रवा, आंबट ताक २ वाट्या, मीठ, १ मोठा कांदा ( टोमॅटो सुद्धा घालू शकता ), कढीपत्ता, २ हिरव्या मिरच्या, हिंग, फोडणीसाठी तेल, मोहरी, उडीद डाळ, खोबरे कोथिंबीर.

कृती : 
           केशर रवा कढईत खमंग भाजून ताटात काढून बाजूला ठेवावा. कढईत फोडणीसाठी तेल घालावे. मोहरी, उडीद डाळ घालून मिरच्यांचे तुकडे, हिंग, कढीपत्ता घालावा व कांदा घालून परतून घ्यावा. टोमॅटो  आवडत असल्यास कांद्याबरोबर टोमॅटो परतून घ्यावा. त्यातच १ वाटी पाणी घलावे व ताक घालून उकळी येऊ द्यावी. मग मीठ घालून, भाजलेला रवा घालून ढवळावे. गॅस बारीक करावा. हळूहळू  ते घट्ट होईल. सर्व्ह करताना खोबरे कोथिंबीर वरून घालावे. 
           नेहमीच्या पांढर्या रव्यापेक्षा हा रवा पौष्टिक असतो.  
           

Wednesday, September 2, 2015

केशर रव्याचा शिरा ( keshar Ravyacha Shira )

साहित्य :
            २ वाट्या केशर रवा, ३ वाट्या पाणी, २ वाट्या गूळ, बदाम काजू तुकडे, बेदाणे, वेलदोडयाची पूड, ४ चमचे तूप. 

कृती :
        कढईत तूप गरम करून त्यात केशर रवा खरपूस भाजून घ्यावा. तोवर दुसरीकडे पाणी व गूळ एकत्र करून उकळावयास ठेवावे. गूळ विरघलळल्यावर ते पाणी रव्यावर घालून हलवावे. रवा शिजल्यावर त्यात ड्रायफ्रूटस् व वेलदोड्याची पूड घालावी. आवडीप्रमाणे गूळाचे प्रमाण कमी - जास्त करता येते. 
         केशर रवा म्हणजेच बारीक दलिया.   

दलिया ( Daliya )

साहित्य : 
           २ वाट्या दलिया, २ वाट्या चिरलेला गूळ, १ वाटी खोवलेला नारळ, तूप, काजू बदाम तुकडे, दूध २ वाट्या, वेलदोडयाची पूड. 

कृती :
          कुकरमध्ये दलिया पाणी घालून शिजवून घ्यावा. शिट्टी बसल्यावर बाहेर काढून डावाने सारखा करून घ्यावा. कढईत थोडे तूप गरम करावे. त्यात शिजवलेला दलिया व खोवलेला नारळ घालून हलवावा. मोकळा करून, अगदी थोडे पाणी घालून एकजीव करून घ्यावा. म्हणजे गोळे राहणार नाहीत. मग त्यात गूळ घालून मंद आंचेवर शिजवत हलवावा. गूळ पातळ होऊन विरघळल्यावर काजू बदाम तुकडे घालून खाली उतरवावे. त्यात गरम दूध व वेलदोडयाची पूड घालावी. दूधाचे प्रमाण कमी  - जास्त करून आवडीप्रमाणे पातळ अगर घट्ट करता येते. 

Sunday, August 30, 2015

नारळीभात ( Coconut Rice )

साहित्य :
           तांदूळ २ वाट्या,  एक खोवलेला नारळ,  चिरलेला गूळ २ वाट्या,  काजू - बदाम तुकडे, बेदाणे, वेलदोडयाची पूड, तूप, ५ - ६ लवंगा.

कृती : 
        तांदूळ  धुवून निथळून ठेवावेत. अर्ध्या तासानंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. दुसरीकडे कढईत तूप गरम करून त्यात लवंगा घालून तळून तांदूळ घालावेत. तांदूळ मोकळा होईपर्यंत परतावे. मग त्यात नारळाचा चव घालून परत थोडावेळ परतावे. मग गरम पाणी घालावे. भात शिजत आल्यावर, काजू बदाम तुकडे, बेदाणे घालून हलवावे. भात पूर्ण शिजल्यावर त्यात चिरलेला गूळ घालावा. मंद आचेवर शिजवावे. गूळ पातळ होऊन विरघळल्यावर हलवून झाकण ठेवावे. खाली भात करपणार नाही याची काळजी घ्यावी. वेलदोड्याची पूड घालावी. खाताना भातावर थोडे ओले खोबरे पसरावे व तूप घालावे. गूळामुळे या भाताला खमंगपणा येतो. 

Wednesday, August 19, 2015

बाजरीचे उंडे ( Bajariche Unde )

साहित्य :
            बाजरी अर्धा किलो, मीठ, तेल, पाणी, दूध, गूळ. 

कृती : 
         मिक्सरवर  बाजरीचा रवा करून घ्यावा. एका पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे त्यात २ चमचे तेल व १/२ चमचा मीठ घालावे.  तेवढाच म्हणजे तीन वाट्या  बाजरीचा रवा घेऊन उकळलेल्या पाण्यात घालावा व त्याची चांगली उकड काढावी. उकड तयार झाल्यावर ती परातीत तेलाच्या हाताने चांगली मळून घ्यावी. त्याचे छोटे गोळे करून दिव्यासारखा / पणतीसारखा आकार द्यावा. एका मोठ्या पातेल्यात पाणी ठेऊन त्यावर चाळणीला तेल लावून ठेवावी. चाळणीवर हे उंडे पालथे ठेऊन त्यावर झाकण ठेवावे. १५ - २० मिनिटे वाफवून काढावेत. किंवा मोदक पात्रात वाफवले तरी चालतील. नंतर पाव लीटर दुधात २ ते ३ टेबलस्पून गूळ घालून विरघळल्यावर त्याबरोबर हे उंडे खायला द्यावेत. 
           गोड आवडत नसल्यास बाजरीच्या रव्यात मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक करून घालाव्यात. 
           हा पदार्थ शक्यतो दिव्याच्या अमावस्येदिवशी केला जातो. काहीजण भिजवलेल्या कणकेचे दिवे करून वाफवतात.

पुरणाचे दींड ( Puranache Dind )

साहित्य :
            दीड वाटी हरभर्याची डाळ, दीड वाटी चिरलेला गूळ, वेलदोडयाची पूड / जायफळाची पूड, तीन वाट्या कणिक ( गव्हाचे पीठ ), चवीपुरते मीठ, तेल, चिमुटभर खाण्याचा सोडा.

कृती : 
           हरभर्याची डाळ धुवून पाणी घालून त्यात चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा व कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ चाळणीवर ठेवून पाणी निथळून टाकावे. जाड बुडाच्या पातेल्यात डाळ घेऊन डावाने घोटावी. त्यात गूळ घालून परत शिजवून घ्यावे. पुरण तयार झाल्यावर खाली उतरवून त्यात वेलदोडयाची किंवा जायफळाची पूड घालावी. हे पुरण पुरणयंत्रातून बारीक करण्याची आवश्यकता नाही. पुरण शिजवताना त्यात डाव उभा ठेवून बघावा, तो जर बाजूला पडला तर अजून पुरण शिजले नाही असे समजावे. पण जर तो डाव खडा उभा राहिला तर पुरण तयार झाले.
          कणकेमध्ये मीठ घालून तेल लावून पोळीप्रमाणेच भिजवून ठेवा. त्या पीठाचे छोटे - छोटे गोळे करावेत. पुरी लाटून त्यात मधोमध पुरण घालून समोरासमोरच्या बाजू एकमेकांवर येतील अशा पद्धतीने घड्या घालून, आयताकृती दींड तयार करून, मोदक पात्रात ही दींड १५ - २० मिनिटे उकडून घ्यावेत. किंवा एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवावी, चाळणीला थोडे तेल लावून त्यावर दींड ठेवून वर ताट झाकूनही उकडून घेता येतात. तुपाबरोबर खायला छान लागतात. नागपंचमीचे दिवशी हा पदार्थ केला जातो.
          धोंड्याच्या महिन्यात ( अधिक महिन्यात  ) याचप्रकारे, फक्त गोल आकाराचे धोंडे करून देवाला नैवेद्य दाखवला जातो.
             

बटाटे व पोह्याचे वडे ( Batate v pohyache vade )

साहित्य :
            ५ मध्यम आकाराचे बटाटे, १ बाऊल भिजवलेले पोहे, मीठ, तिखट, वडे तळण्यासाठी तेल.

कृती :
           बटाट्याची सालं काढून किसून घ्या. त्यात भिजवलेले पोहे, तिखट, मीठ घालून नीट कालवा. नंतर त्याचे गोल अथवा चपटे गोळे तयार करून मंद आँचेवर तळून घ्या. टोमेटो सॉस किंवा कोणत्याही चटणीबरोबर हे वडे चांगले लागतात.

चिंचेचे सार ( Tamarind Saar )

साहित्य :
            १ वाटी चिंचेचा कोळ, १/२ वाटी गूळ, तिखट २ टीस्पून, मीठ चवीनुसार, हिंग, दालचिनीपूड १/२ टीस्पून व लवंग पूड १/४ टीस्पून, १ चमचा किसलेले आलं, पाव वाटी तूप, जिरे, किसलेले कोरडे खोबरे २ चमचे, कोथिंबीर.

कृती : 
          १ ते दीड वाटी चिंच अर्धा तास भिजवावी. नंतर त्या चिंचेचा पाणी घालून - घालून पूर्ण कोळ काढून घ्यावा. कढईत तूप घालून जिर्याची फोडणी करावी, त्यातच हिंग, दालचिनीपूड व लवंगपूड, किसलेले आलं घालून चिंचेचा कोळ घालावा. हवे तेवढेच  पाणी घलावे, मग तिखट, मीठ, गूळ घालून हलवावे. खोबरे, कोथिंबीर घालून उकळावे.
          हे सार नुसते प्यायला पण चांगले लागते अथवा मुगाच्या खिचडीबरोबर, भाताबरोबर चांगले लागते.
             

Friday, July 31, 2015

रस्सम् ( rassam )

साहित्य :
          प्रथम रस्सम् पावडर तयार करण्यासाठी - तूरडाळ,  हरबरा डाळ,  उडीद डाळ प्रत्येकी एक चमचा, १ वाटी धणे, १/२ वाटी जिरे, २ चमचे मिरे, ७ - ८ लाल मिरच्या, हिंग, सूंठ. 
            चिंच, गूळ, मीठ, कढीपत्ता, १ - २ लाल मिरची, ५ - ६ टोमॅटो, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, आलं.

कृती : 
         रस्सम् पावडर करण्यासाठी धणे, जिरे, मिरे, लाल मिरच्या व तूरडाळ, हरबरा डाळ, उडीद डाळ हे सर्व साहित्य भाजून घ्यावे. त्यात हिंग, सूंठ घालून मिक्सरवर बारीक पावडर करून घ्यावी. 
           टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. तेलाची फोडणी मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून करावी, त्यातच लाल मिरची, आलं किसून घालावे व तयार रस्सम् पावडर घालून टोमॅटो घालावेत. थोडा वेळ परतून  त्यात चिंचेचा कोळ, पाणी घालावे. मीठ व गूळ घालून उकळावे.
           रस्सम् पावडर तयार करूनच ठेवली म्हणजे ऐनवेळी वेळ वाचतो व इतरही काही पदार्थात तो मसाला  घालता येतो. 
         

Saturday, July 25, 2015

टोमॅटो सार ( Tomato Saar )

साहित्य : 
           ७ ते ८ टोमॅटो , तूप, जिरे फोडणीसाठी, लवंग पूड १/४ टीस्पून, दालचिनी पूड १/२ टीस्पून, हिंग, लाल तिखट, मीठ, ४ - ५ चमचे साखर.

कृती : 
          टोमॅटो बारीक चिरून पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर एका पातेल्यात त्यातील पाणी निथळून घ्या व बाजूला ठेवा. बाकी टोमॅटो मिक्सरवर चांगले बारीक करून घ्या. कढईत तूप घालून जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यातच लवंग पूड, दालचिनी पूड, लाल तिखट घालावे. मग त्यात बारीक केलेले टोमॅटो व बाजूला ठेवलेले त्यातील पाणी घालून ढवळावे. गरजेनुसार परत थोडे पाणी घालून पातळ करावे. मीठ व साखर घालून उकळावे. साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी- जास्त करावे. हे सार भाताबरोबरही छान लागते अथवा नुस्ते पिण्यासही छान वाटते. 

लाल / हिरव्या टोमॅटोची चटणी ( Red / Green Tomato Chutney )

साहित्य : 
             लाल / हिरवे टोमॅटो, तेल, मोहरी, हिंग, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, दाण्याचा कूट, गूळ, व्हिनिगर, हिरव्या मिरच्या.

कृती :
           लाल टोमॅटो : बारीक फोडी करून थोड्याशा तेलावर वाफवून ( शिजवून ) घ्याव्यात. मग तेल मोहरीची फोडणी करून त्यात हिंग, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ, दाण्याचा कूट व टोमॅटोच्या फोडी घालून, त्यात गूळ ( जरा जास्तच ) घालून चांगले शिजवावे. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक करावे. जास्त दिवस टिकण्यासाठी व्हिनिगर घालावा.
            हिरवे टोमॅटो : तेलावर फोडी वाफवून तसेच हिरव्या मिरच्या ( लाल तिखटाऐवजी ) तेलावर वाफवून वरीलप्रमाणेच बाकी सर्व कृती करावी.




Friday, July 24, 2015

टोमॅटो सॉस, केचप ( Tomato Sauce, Ketchup )

साहित्य : ( सॉससाठी )
              ३ किलो टोमॅटो , अर्धा किलो साखर, ५ - ६ लवंगा, ४ - ५ तुकडे दालचिनी, ५ - ६ काळे मिरे, व्हिनिगर, छोटा अर्धा चमचा सोडियम बाय कार्बोनेट, २ चमचे मीठ.
              ( केचपसाठी )
                 वरील सर्व साहित्यासह आलं लसूण पेस्ट व लाल तिखट.

कृती :   ( सॉससाठी )
          चांगले लाल व कडक असे निवडून टोमॅटो घ्यावेत. म्हणजे सॉसला रंग छान येतो. ते बारीक चिरून पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. पोह्याच्या चाळणीतून ( हाताने दाबत गाळून - गाळून चोथा कोरडा होईपर्यंत ) गाळून घ्यावे. लवंग, दालचिनी, काळे मिरे मिक्सरवर बारीक पूड करून घ्या. ही पूड एका स्वच्छ पातळ कापडात अगर रूमालात घालून पुरचुंडी करावी. जाड बुडाच्या पातेल्यात टोमॅटोचा रस गॅसवर शिजवत ठेवावा. त्यात ती पुरचुंडी बुडवून ठेवावी. रस आटून घट्ट व्हायला लागतो. एकसारखे ढवळत रहावे. त्यावेळेस एका छोट्या ताटलीत थेंब टाकून बघावा. त्याच्या कडेने पाणी दिसेनासे होईपर्यंत शिजवावे. मग त्यात साखर घालून परत शिजवावे. घट्ट झाल्यावर त्यात २ चमचे मीठ घालून ढवळून खाली उतरवावे. पुरचुंडी दाबून, पिळून काढून टाकावी. गार झाल्यावर त्यात टिकाऊपणासाठी व्हिनिगर व छोटा अर्धा चमचा सोडियम बाय कार्बोनेट घालावे. स्टरलाईझ्ड  बाटल्यांमध्ये भरून ठेवावे. 
             ( केचपसाठी )
              सर्व कृती वरीलप्रमाणेच फक्त पुरचुंडीमध्ये वरील पूडसहित आलं लसूण पेस्ट घालावी. व लाल तिखट घालून साखरेचे प्रमाण कमी करावे.


हिरव्या मिरच्यांचे लोणचे ( Green Chillies Pickle )

साहित्य :
            थोड्या जाडसर पाव किलो हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी मोहरी, २ चमचे मेथ्या, २ चमचे हिंगपूड, पाऊण वाटी मीठ, 
 २ चमचे हळद, एक वाटी लिंबाचा रस, एक वाटी तेल.

कृती :
            मेथ्या थोड्या तेलात बदामी रंगावर तळून गार झाल्यावर पूड करावी. मोहरी भाजून बारीक करावी. एक वाटी लिंबाच्या रसात मोहरी पूड घालून ताकाच्या रविने फेसावी. त्यात एक चमचा हळद, एक चमचा हिंगपूड, मेथीपूड व मीठ घालून कालवून मसाला तयार करावा. मिरच्यांचे तुकडे करून त्यात घालावेत. मग उरलेली हळद, हिंग, तेलाची मोहरी घालून फोडणी करून ती गार झाल्यावर त्यात घालून हलवावे. 
             मिरच्यांऐवजी कुठल्याही भाजीच्या लोणच्याला हा मसाला चालेल. फक्त त्यात लाल तिखट घालावे.

Saturday, July 18, 2015

लिंबाची चटणी ( Lemon Chutney )

साहित्य :
         १० - १२ लिंबं, चार वाट्या गूळ किंवा साखर, दोन चमचे जिरे, पाव वाटी लाल तिखट, पाव वाटी मीठ, एक इंच 
किसलेले आले.

कृती :
            पिवळीधमक पातळ सालींची मध्यम आकाराची लिंबं घ्यावीत. लिंबांच्या बारीक फोडी कराव्यात. चिरतानाच त्यातील बिया काढून टाकाव्यात. साधारण चार वाट्या फोडी झाल्यास तेवढाच चिरलेला गूळ किंवा साखर घ्यावी. पाव वाटी लाल तिखट, पाव वाटी मीठ, किसलेले आले, गूळ / साखर व लिंबांच्या फोडी एकत्र कालवून घ्यावे. नंतर दोन चमचे जिरे मिक्सरवर प्रथम बारीक करून त्यातच कालवलेले लिंबांचे सालीसकट मिश्रण थोडे - थोडे घालून बारीक करावे. नंतर सर्वच एकजीव करून घ्यावे. ही चटणी लगेच खायला घेतली तरी चालते. पण मुरल्यावर आंबट - गोड, कशाबरोबरही छान लागते. फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकते.



Friday, July 10, 2015

लिंबाचे सरबत ( Lemon Sarbat - Concentrated )

साहित्य :
           १० लिंबं, रसाच्या तिप्पट साखर, पाणी.

कृती : 
           लिंबांच्या अर्ध्या फोडी करा. लिंबू पिळण्याच्या यंत्राने रस काढून घ्या. तो रस गाळून, वाटीने मोजून ठेवा. एका जाड बुडाच्या पातेल्यात रसाच्या तिप्पट साखर घेऊन ती बुडेपर्यंत पाणी घालून एकतारी पाक करून घ्या. पाक गार झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून ढवळा. पुन्हा गाळून बाटलीत भरून ठेवा. सरबत करताना चार ते पाच चमचे रस घेऊन चवीपुरते मीठ घालून, एक ग्लास पाणी घालावे व सरबत तयार करावे. 

कैरीचे पन्हे ( kairiche Panhe )

साहित्य :
             चार कैर्या, साखर, वेलदोडयाची पूड.

कृती :
           कैर्या कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर, त्याची सालं व कोयी काढून नुसता गर मिक्सरवर फिरवून एकजीव करून घ्या. निघालेला गर मोजून त्याच्या दुप्पटीपेक्षा कमी साखर घालून एका कढईत गॅसवर शिजवायला ठेवावा. साखर पूर्णपणे विरघळून गराचा रंग पारदर्शी झाल्यावर खाली उतरवावे व त्यात वेलदोड्याची पूड घालावी. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावे. खूप दिवस टिकते. फ्रीजमध्ये ठेवले तरी चालते. पन्ह करताना २ टेबलस्पून गरामध्ये एक ग्लास पाणी व चवीपुरते मीठ घालून द्यावे. केंव्हाही झटपट पन्हे तयार करता येते. 

Wednesday, July 8, 2015

कैरीचा तक्कू ( kairicha takku )

साहित्य :
             अर्धा किलो घट्ट कैरी, ३ चमचे लाल तिखट, मीठ, २ चमचे मोहरी पूड, १ चमचा मेथीपूड, १ चमचा जिरेपूड, हिंग, तेल, हळद, चवीपुरता गूळ.

कृती :
        कैरीची साल काढून किसावी. मोहरीपूड, मेथीपूड व जिरेपूड एकत्र करून थोडे गरम करावे. गार झाल्यावर हे मिश्रण व हिंग, मीठ कैरीच्या किसात घालून चांगले मिसळावे. त्यात गूळ घालावा व सर्व कालवून बरणीत तक्कू घालावा. दोन दिवसांनी ४ चमचे तेलाची मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी व गार झाल्यावर तक्कूवर घालून हलवावे. सहा महिने तक्कू टिकतो.

Tuesday, July 7, 2015

मेथांबा ( Methamba )

कसाहित्य :
           दोन घट्ट कै-या, एक वाटी गूळ, एक चमचा लाल तिखट, मीठ, मेथ्या, जिरे, हिंग, हळद, फोडणीसाठी तेल.

कृती :
         कैरीची साल काढून साधारण पातळ काप करावेत किंवा कैरी किसून घेतली तरी चालेल. कढईत तेल घालून मोहरी, मेथ्या, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करून त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात. मीठ घालून फोडी शिजवाव्यात पाणी घालू नये. वाफेवर चांगल्या शिजल्या की त्यात तिखट, गूळ घालावा व मंद आचेवर शिजवावे. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावे. हा मेथांबा दोन महिने टिकतो. 

कैरीचा छुंदा ( kairicha chhunda)

साहित्य :
              अर्धा किलो घट्ट कैरी, २ वाटया साखर, २ चमचे लाल तिखट, मीठ, १० - १२ लवंगा, दालचिनीचे २ तुकडे, जिरेपूड  -मिरपूड प्रत्येकी एक चमचा, मेथीपूड - हिंगपूड प्रत्येकी अर्धा चमचा.

कृती :
        कैरी धुवून पुसून साल काढून किसून घ्यावी. त्यात मीठ, साखर घालून  दोन तास झाकून ठेवावी. किसाला पाणी सुटेल. लवंगा, दालचिनी गरम करून बारीक पूड करावी. किस, मीठ, साखर या मिश्रणात लवंगा, दालचिनी, जिरेपूड, मिरपूड, मेथीपूड घालावी. नंतर तिखट घालून चांगले मिसळावे. काचेच्या बरणीत भरून झाकण न घालता बरणीचे तोंड रूमालाने बंद करावे. ८ दिवस बरणी उन्हात ठेवावी. रोज बरणी हलवावी. साखर विरघळलेली दिसली की छुंदा तयार ! आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी - जास्त करता येइल. सहा महिने छुंदा चांगला टिकतो.

Monday, July 6, 2015

कैरीचे लोणचे ( Mango Pickle )

साहित्य : 
             एक किलो कैरी, एक वाटी मोहरीची डाळ, दीड वाटी मीठ, अर्धी वाटी लाल तिखट, पाव वाटी हळद, ४ चमचे हिंगपूड, २ चमचे मेथ्या, पाव किलो तेल.

कृती : 
            कैरीच्या फोडी करून घ्याव्यात, मेथ्या थोड्या तेलावर तळून बारीक करून घ्या, हिंगपूड पण तेलावर थोडी परतून घ्या. मोहरीची डाळ भाजून थोडी बारीक करावी. नंतर तिखट, मीठ, हळद, मेथ्यांची पूड, मोहरीची डाळ, हिंगपूड हे सर्व साहित्य एकत्र करून मसाला तयार करावा. हा तयार मसाला मंद आचेवर थोड़ा भाजून घ्यावा. मसाला गार झाल्यावर कैरीच्या फोडी त्यात घालून कालवाव्यात. बरणीत भरून एक दिवस तसेच ठेवावे. दूसरे दिवशी तेल गरम करून , ते पूर्ण गार झाल्यावर वरून ओतावे. तसेच नंतर हिंग व मोहरीची खमंग फोडणी करून गार झाल्यावर घालावी व लोणचे नीट हलवावे. साधारण तीन दिवसांनी लोणचे परत हलवावे. 


Sunday, July 5, 2015

लिंबाचे गोड़ लोणचे ( Sweet Lemon Pickle )

साहित्य :
           १ डझन लिंबं, अर्धी वाटी लाल तिखट, अंदाज़े वाटीभर मीठ, अर्धा चमचा मेथी, अर्धा किलो गूळ किंवा  साखर, चमचाभर हळद, चमचाभर हिंगपूड, तेल.

कृती :
       मेथ्या तेलावर खमंग परतून पूड करावी. लिंबाच्या फोडी कराव्यात. फोडींना हळद व मीठ लावून त्या ५ - ६ दिवस मुरत ठेवाव्यात. नंतर गूळ किंवा साखरेचा गोळीबंद पाक करावा. त्यात मुरलेल्या लिंबाच्या फोडी, तिखट, मेथीपूड, हिंगपूड घालून हलवावे व एक चटका द्यावा. हे लोणचे मस्त आंबट - गोड चवीचे होते. 

( टिप : हे लोणचे उपवासाचे करावयाचे असल्यास त्यात हिंग, हळद, मेथी न घालता बाकी साहित्य व कृती वरीलप्रमाणेच. )

लिंबाचे लोणचे ( Lemon Pickle )

साहित्य :
           धुवून पुसलेल्या लिंबाच्या फोडी ४ कप, ताज्या लिंबाचा रस पाव कप, १ टेबलस्पून हळद, तिखट पाव कप, हिंग १ चमचा, मोहरी पूड २ चमचे, मेथी २ टेबलस्पून, फोडणी.

कृती :
           लिंबं चिरताना बिया काढून टाकाव्यात. मंद गॅसवर कढईत हिंग, हळद व मेथीदाणे स्वतंत्रपणे भाजावेत. मग मेथीदाण्यांची पूड करावी. मीठ व तिखटही भाजून घ्यावे.थंड झाल्यावर सर्व एकत्र करावे. त्यात लिंबाच्या फोडी घालून कालवावे व बरणीत दाबत - दाबत भरावे. वरून लिंबाचा रस ओतावा. झाकण घट्ट लावावे. अधून - मधून हलवावे. ७ - ८ दिवसांनी, फोडींचा रंग बदलल्यावर फोडणी करून ती गार झाल्यावर वरून ओतावी. 

झटपट लिंबू लोणचे ( Quick Lemon Pickle )

साहित्य :
           ५ - ६ पिवळीधमक लिंबं, १ वाटी साखर, १/२ वाटी खारकेचे तुकडे व बेदाणे एकत्रित, २ - ३ टेबलस्पून मीठ, २ टेबलस्पून   जिरेपूड, १/४ वाटी लाल तिखट.

कृती :
        लिंबं बारीक चिरून घ्या. सगळ्या बिया काढून टाका. कुकरमध्ये खाली पाणी घालून एका डब्यात फोडी घालून त्यात ठेवा. शिट्टी काढून टाका व मोठ्या गॅसवर ५ मिनिटे कुकर ठेवा. गॅस बारीक करून परत ७ - ८ मिनिटे शिजू द्या. गॅस बंद करून फोडी थंड झाल्यावर त्यात साखर व मीठ घालून ढवळा. मिश्रण काचेच्या बरणीत ठेवा. ३ - ४ दिवस रोज मिश्रण ढवळा. मधासारखा पाक दिसायला लागल्यावर त्यात तिखट, जिरेपावडर, ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे घालून व्यवस्थित ढवळा. साधारण   ८ - १० दिवसात हे लोणचे छान मुरते. या लोणच्याला पाण्याचा हात मात्र लागू नये याची दक्षता घ्या.

पूड चटणी ( pood chatani )

साहित्य : 
             १ वाटी हरबरा डाळ, १ वाटी उडीद डाळ, १/२ वाटी धणे, १/२ वाटी जिरे, लाल मिरच्या ५ - ६, हिंग, १ वाटी कढीपत्त्याची पाने, १/४ वाटी तीळ, १/४ वाटी किसलेले सुके खोबरे, १/४ वाटी नवीन चिंच, १/४ वाटी गूळ, हळद, मीठ, फोडणी, तेल.

कृती :
           हरबरा डाळ व उडीद डाळ भाजून त्याचा रवा काढावा. कढीपत्त्याची पाने तेलावर परतून घ्यावी. धणे, जिरे, लाल मिरची, हिंग, तीळ, खोबरे हे सर्व तेलावर परतावी. चिंच पण निवडून घेऊन तेलावर तळल्यासारखीच परतावी. हे सर्व मिक्सरवर बारीक करून त्यात गूळ, हळद, मीठ घालून सगळा भरडा ( रव्याप्रमाणे ) करून थोड्या फोडणीवर एकत्र करावे.
ही चटणी इडलीबरोबर पण छान लागते किंवा त्यात वरून तेल अथवा दही घालूनही छान लागते.


Friday, January 16, 2015

तीळाच्या वड्या

साहित्य :
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या पांढर्या तीळाचा कूट, गूळ, किसलेले कोरडे खोबरे, पाणी
कृती :
भांड्यात थोडा गूळ घालून त्यात अगदी थोडेसेच पाणी घालून गॅसवर मंद आंचेवर ठेवावे. सारखे ढवळत रहावे. गूळ पातळ झाल्यावर बुडबुडे यायला लागल्यावर खाली उतरवून त्यात शेंगदाण्याचा व तीळाचा कूट समप्रमाणात घालावा. गोळा झाल्यावर,
ताटाला थोडे तूप लावून त्यावर तो थापावा थापतानाच त्यावर किसलेले खोबरे पसरावे व वड्या पाडाव्यात.

ड्रायफ्रूट लोणचे ( Dry Fruit Pickle )

साहित्य : 
१ किलो लिंब, १ किलो साखर, १ वाटी मीठ, १०० ग्राम खारीक ( बीया काढून ), १०० ग्राम जर्दाळू ( बीया काढून ), ५० ग्राम मनुका, ५० ग्राम आले, ५० ग्राम जिरे, ५० ग्राम मीरे ( जाडसर पूड करून ), ५० ग्राम सुक्या लाल मिरच्या.
कृती : 
खारीक , जर्दाळूचे तुकडे करून घ्यावेत, मिरच्याचे तुकडे करावेत, एका लिंबाच्या ८ याप्रमाणे तुकडे करून बीया काढाव्यात, साखरेशिवाय सर्व साहित्य एकत्र करावे व ते मुरल्यावर ( ७-८ दिवसांनी ) एका पातेल्यात काढून घेऊन त्यात साखर घालून मिसळावे. २-४ तासांनी साखर विरघळेल. बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकते.

कणकेचे लाडू : ( Kanakeche Ladoo - Wheat flour Ladoo )

साहित्य :
           ४ वाटया   कणिक, १ १/२ वाटया बेसन, ३ वाटया जाड पोहे, किसलेले कोरडे खोबरे पाव वाटी, खारीक पावडर पाव वाटी, खसखस पाव वाटी, पांढरे तीळ पाव वाटी, गूळ किसून ३ वाट्या, तूप, वेलदोड्याची पूड.

कृती :
         कणिक तूपावर चांगली बदामी रंगावर भाजावी. बेसन पण भरपूर तूपावर भाजून घ्यावे. जाड पोहे भाजून हाताने चुरावे किंवा मिक्सरवर जाडसर करावे. खोबरे, खसखस, तीळ भाजून बारीक करून घ्यावे. हे सर्व साहित्य आणि खारीक पावडर एकत्र करावे. त्यात गूळ मिसळून खूप मळावे. ( गूळ गरम करून पातळ केला तरी चालेल, पण तो जास्त वेळ गॅसवर ठेवल्यास मिश्रण कोरडे होऊ शकते ). गूळाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त घेऊ शकता. त्यात वेलदोड्याची पूड घालून लाडू वळावेत.