Thursday, November 27, 2014

वाटली डाळ ( watli Daal)

साहित्य :
२ वाटया हरबरा डाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, तेल फोडणीसाठी, मोहरी १ चहाचा चमचा, १/२ चहाचा चमचा हिंग, हळद, मीठ आवडीनुसार, नारळाचा चव, कोथिंबीर, साखर, २ चमचे लिंबाचा रस, कढीपत्ता ५-६ पाने. 
कृती:
हरबरा डाळ ४ तास  भिजवावी. नंतर डाळ पाण्यातून उपसून काढून, मिक्सरवरून हिरव्या मिरच्या व डाळ एकत्र थोडी जाडी - भरडी करावी. कढईमधे फोडणीसाठी तेल घालावे. त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर कढीपत्त्याची पाने घालावीत व १/२ चहाचा चमचा हिंग घालावा, हळद घालावी. मग त्यात बारीक केलेली डाळ घालून ती पूर्णपणे कोरडी होईपर्यंत मंद आचेवर झाकण ठेवून परतावी. मग त्यात मीठ व १ चमचा साखर घालून हलवावे. त्यात लिंबाचा रस घालून हलवावे. 
डीशमधे देताना वरून कोथिंबीर व नारळाचा चव घालावा. 

Thursday, November 20, 2014

मेथीचे लाडू ( Methiche Ladoo)


साहित्य :
 १।२ वाटी मेथ्या (मेथी दाणे), ४ वाटया कणिक,पाव वाटी खारीक पावडर, १।२ वाटी  खिसलेले खोबरे, ३ वाटया      पिठीसाखर, पाव वाटी खसखस, वेलदोडयाची पूड, २ वाटया तूप.
कृती : 
मेथ्या मिक्सरवर बारीक करून घ्याव्यात. कणिक तूपावर खरपूस भाजून घ्यावी. खसखस भाजून बारीक करून घ्यावी. खोबरे पण चांगले भाजून हाताने चुरून घ्यावे. मग मेथ्या, कणिक, खसखस, खोबरे, खारीक पावडर, वेलदोडयाची पूड हे सर्व साहित्य एकत्र करावे व त्यात त्या मिश्रणाच्या अर्धी पिठीसाखर घालावी. त्याचे लाडू वळताना ज़र तूप कमी वाटले तर वरून थोड़े तूप घालून लाडू वळावेत. आवडत असल्यास बेदाणे घालावेत. 
हे लाडू बाळंतिणीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. 

Thursday, October 30, 2014

दहीबेसन वडी ( DahiBesan Vadi)

साहित्य : 
१ वाटी बेसन, २ वाटया दही, ३ वाटया साखर, वेलदोडयाची पूड, पाव वाटी पिठीसाखर, केशरी रंग.
कृती: 
बेसन, दही, साखर एकत्र कढईत घेऊन गॅसवर शिजवावयास ठेवावे. सारखे हलवत रहावे.
घट्ट होत आले की थोडा केशरी रंग व वेलदोडयाची पूड घालून मिश्रण आळून येण्यासाठी थोड़ी पिठीसाखर घालावी,पोळपाटाला तूप लावून त्यावर मिश्रण ओतावे. त्यावर प्लास्टिक  पेपर ठेवून लाटण्याने लाटावे. वड्या पाडाव्यात.