Tuesday, September 27, 2016

मुंबई हलवा ( Mumbai Halwa )

साहित्य :
            १ वाटी कस्टर्ड पावडर ( कोणत्याही स्वादाची Flavored ),  ३ वाट्या साखर, ४ वाट्या पाणी, ४ चमचे तूप, काजूचे बारीक तुकडे.

कृती :   
            नाॅनस्टीक पॅनमध्ये पाणी व साखर पूर्ण विरघळून घ्या. मग त्यात कस्टर्ड पावडर मिसळावी, गुठळ्या राहू देऊ नये. मग हे मिश्रण गॅसवर शिजवायला ठेवावे. घट्ट होत आल्यावर त्यात तूप व काजूचे तुकडे घालून मंद आचेवर ढवळत रहावे. मग चांगले घट्ट झाल्यावर खाली उतरवून आधीच तूप लावून ठेवलेल्या थाळीत, थाळी हलवून नीट पसरावे. ५ मिनिटांनी वड्या पाडाव्यात.
             कस्टर्ड पावडर फ्लेवर्ड असल्यामुळे वेगळा ईसेन्स किंवा रंग घालण्याची गरज नाही.
              फेटोतील वड्या मॅंगो फ्लेवर्ड असल्याने पिवळ्या रंगाच्या दिसत आहेत.

Tuesday, June 14, 2016

गुलगुले ( गोड धीरडी ) ( Gulgule )

साहित्य :
             १ वाटी गूळ, २ वाट्या कणिक, पाव वाटी रवा, ४ चमचे तांदूळपिठी, चिमूटभर मीठ. 

कृती :
          १ गूळ ३ वाट्या पाण्यात पूर्णपणे विरघळवून घ्यावा. त्यात कणिक, रवा, तांदळाचे पीठ घालून नीट मिसळून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नवे. मग त्यात परत पाणी घालून पीठ धीरडी करण्या इतपत पातळ करून घ्यावे व मग मीठ घालून हलवावे. तव्याला तेल लावून पातळ धीरडी करावीत. गॅस मंद असावा. दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्यावे. खूप मऊ  व चविष्ट लागणारी ही धीरडी सगळ्यांना आवडतील. ऐनवेळेस पटकन खायला करण्यासारखा हा पदार्थ आहे.

Tuesday, January 12, 2016

गुळाच्या पोळ्या ( Gulachya Polya - Jaggery Roti )

साहित्य :
            गुळ तयार करण्यासाठी ........ १ किलो ( ४ वाट्या ) गुळ, १ वाटी पांढरे तीळ, १/२ वाटी बेसन, वेलदोडयाची पूड, तेल.
             पोळीसाठी  कव्हर ...... ४ वाट्या कणिक, १ वाटी मैदा, पाव वाटी बेसन, दीड वाटी रवा, चवीपुरते मीठ, तेल.

कृती :
            चांगला पिवळा मऊ गुळ घ्यावा. किसणीला, ताटाला व हाताला तेल लावून गुळ किसून घ्यावा. पांढरे तीळ भाजून कूट करून घ्यावा. थोड्या तेलावर बेसन चांगले खरपूस भाजून घ्यावे. मग गुळ, बेसन, तीळाचा  कूट, वेलदोडयाची पूड हे सर्व एकत्र करून तेल लावून नीट मळून मऊ गोळा करावा. त्यात बारीक खडे राहिले नाहीत ना याची खात्री करून घ्यावी. नाहीतर पोळी भाजताना गुळ बाहेर येऊ शकतो.
             कणिक, मैदा, बेसन, हे चाळून घ्यावेत. मग त्यात रवा, मीठ एकत्र मिसळून, तेलाचे कडकडीत मोहन घालून पीठ घट्ट 
( रोजच्या पोळ्यांप्रमाणे  ) भिजवून तासभर बाजूला ठेवावे. 
              पोळ्या करताना २ गोळे पीठाचे व एक गोळा गुळाचा असे तीनही सारख्याच आकाराचे छोटे गोळे हाताने चपटे करून घ्यावेत. लाटतांना तिन्ही गोळ्यांच्या  प्रथम पुरीपेक्षा लहान पण एकसारख्या आकाराच्या पार्ऱ्या लाटून मग मधोमध गुळाची व वर खाली पीठाची पारी ठेवून हाताने कडा जराशा दाबून घ्याव्यात. लाटण्याने आधी मधे व नंतर कडेने दाब देऊन पोळी लाटावी. गुळ पोळीच्या कडेपर्यंत पसरला पाहीजे. पोळी लाटण्यासाठी मैदा वापरावा. म्हणजे पोळी भरभर सरकेल. तव्यावर दोन्ही बाजूने पोळी छान खरपूस भाजावी. खाली उतरवून एका कागदावर ठेवावी. एकावर एक अशा पोळ्या न ठेवता, प्रत्येक पोळी स्वतंत्र  ठेवून गार झाल्यावर एकावर एक ठेवाव्यात. ही पोळी जराशी कडक पण खुसखुशीत होते. सुरीने पोळीचे चार भाग करावेत. 
                साजुक तुपाबरोबर पोळी छान लागते व खूप दिवस टिकते. प्रवासातही बरोबर नेता येते. लसणाची चटणी तोंडी लावायला चांगली वाटते. गूळ तयार करून ठेवलेला असला की, केंव्हाही पोळ्या पटकन करता येतात.